जयभीम मित्रांनो,
आजचा हा आर्टिकल मी लिहीत आहे, कारण आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याच दिवशी महान सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. कलिंगचे युद्ध जिंकल्यानंतर युद्धभूमीवरील भीषण रक्तपात, हिंसाचार आणि मरण पावलेल्या लोकांना पाहून त्यांचे मन अत्यंत दुःखी झाले. "लोकांना मारून मिळालेला हा विजय खरा विजय असूच शकत नाही," याची त्यांना तीव्र जाणीव झाली. या आत्मपरीक्षणानंतर त्यांनी इसवी सन पूर्व २६१ च्या सुमारास बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सम्राट अशोकांच्या या ऐतिहासिक विजयाचा दिवस पुढे 'अशोक विजयादशमी' म्हणून साजरा केला जाऊ लागला. बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी हा धम्म संपूर्ण जगभरात पसरवला.
सम्राट अशोकांनी रचलेला हाच महान इतिहास वाचून आणि त्यापासून प्रेरित होऊन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पवित्र भूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी, म्हणजेच सम्राट अशोकांनी ज्या दिवशी धम्म स्वीकारला होता त्याच अशोक विजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांच्यासोबत सुमारे ५ लाख अनुयायांनीदेखील बौद्ध धम्माचा स्वीकार केला.
मित्रांनो, हे जगातील सर्वात मोठे आणि ऐतिहासिक धम्मचक्र परिवर्तन मानले जाते, जे अत्यंत शांततापूर्ण आणि अहिंसेच्या मार्गाने पार पडले. सम्राट अशोकांनंतर असाच एक नवा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचला. सांगायचे तात्पर्य हेच की, जो बौद्ध धम्म आपल्याला मिळाला आहे, तो स्वीकारताना आणि मिळताना जगामध्ये एक नवीन इतिहास निर्माण झाला आहे.
हा इतिहास आपण प्रत्येक वर्षी उत्साहाने साजरा केला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या नव्या पिढीला आपल्या या महान इतिहासाची जाणीव राहील आणि त्याचा कधीही विसर पडणार नाही. कालांतराने लोक सम्राट अशोकांचा हा इतिहास विसरले होते, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा इतिहास पुन्हा शोधून काढला आणि एक नवीन क्रांती घडवून आणली.
आपण सर्वांनी मिळून हा दिवस एका उत्सवासारखा साजरा केला पाहिजे, कारण आपल्यासाठी हा खऱ्या अर्थाने सणच आहे. या दिवशी 'धम्मचक्र प्रवर्तन' झाले आणि भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला धम्म आपण स्वीकारला. भगवान गौतम बुद्धांनी दिलेला मार्ग आणि संदेश आजपर्यंत जगात इतर कोणीही देऊ शकले नाही. त्यांचे तत्वज्ञान हजारो वर्षांपासून चालत आले आहे आणि आजच्या युगातही तितकेच लागू होते. त्यांनी दिलेली शिकवण अत्यंत स्पष्ट आणि मानवकल्याणाची आहे. आपण सर्वांनी आपल्या जीवनात या तत्वज्ञानाचा स्वीकार करून स्वतःचा व समाजाचा विकास करावा, हेच मला या लेखातून सांगायचे आहे.
तुम्ही हा लेख वेळ काढून वाचलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
पुन्हा एकदा सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय!